Wednesday, May 6, 2020

पुन्हा नव्याने..!!

पुन्हा शतसूर्य उजळतील
पुन्हा शतचन्द्र जागतील,
निर्माण सृष्टी करण्यास
पुन्हा ब्रह्म अवतरतील।

अंधारल्या राती सरतील
पुन्हा मशाली पेटतील,
असह्य काटेरी वेदनांतून
संयमीत जीवने फुलतील।

काळ भीतीचा शरमेल
भ्याड विकृति हारतील,
पुन्हा चैतन्य लहरितुनी
लाट निर्धाराची उसळेल।

मळभ निवृत्तिची झटकोनी
पुन्हा पुरूषार्थ स्फुरतील,
कर्तव्य-प्रवृत्तिंचे कूंजन
पुन्हा कानी पडतील।

नवी स्वप्ने पेरून रजनी
उषा उदयाची  प्रसवेल,
हर्षाला  फुटेल  पालवी
सारा  आसमंत  बहरेल।

- चेतन कोठवदे