मी तिथल्या हवेतली शुद्धता फुप्फुसात भरतच होतो... आणि तेवढ्यात एक कुटुंब तिथे आले—आई, बाबा आणि त्यांची तीन मुले. मंदिराकडे जात असताना त्यांनी नंदीचे दर्शन घेतले आणि आतमध्ये जाणार तोच त्यातील लहान मुलगी तिच्या मोठ्या बहिणीला म्हणाली,
"अगं, आपण मंदिरात जाऊ शकत नाही, कारण आपण अंघोळ केलेली नाही..."
हे वाक्य कानावर पडले आणि मनात विचारांची रेलचेल सुरू झाली....!!
आपण नकळत काही कर्मकांड इतकी स्वीकारली आहेत की त्यामागील मूळ अर्थच विसरून गेलो आहोत. पवित्रता म्हणजे नेमके काय? फक्त शरीराची स्वच्छता / आंघोळ केली म्हणजे पवित्रता का?
ज्याच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी शरीराची स्वच्छता आवश्यक मानली जाते, त्याच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी मनाची स्वच्छता, वाणीची शुद्धता आणि कर्माची पवित्रता अधिक आवश्यक का वाटत नाही..?
देवाला शुद्ध दूध, फुले आणि नैवेद्य अर्पण केले म्हणजे सर्व काही झाले का... ?
"शुद्धोदकं समर्पयामि" म्हंटले म्हणजे झालं का सगळ...??
समाजात आपण अनेकदा पाहतो की खोटे बोलणारे, भ्रष्टाचार करणारे, व्यसनाधीन, इतरांचा अपमान करणारे किंवा हिंसक वर्तन करणारे लोकही मंदिराच्या गाभाऱ्यात सहज घुसतात... त्यांना कोणी अडवत नाही..? (निरागस साधकांच्या विश्वातील ही घुसखोरीच म्हणा की??)
मग एखाद्या निष्पाप, निरागस, निस्वार्थ मुलीच्या मनात असा प्रश्न का निर्माण होतो की "अंघोळ केली नाही म्हणून आपण मंदिरात जाऊ शकत नाही?"
कदाचित आपण तिला शरीराच्या स्वच्छतेचे महत्त्व शिकवले, पण मनाच्या स्वच्छतेचे महत्त्व सांगायचे विसरलो का..??
गीतेत भगवंत अर्जुनाला सांगतो...
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे ॥
- तुझे मन मला दे...
कारण शरीर हे वस्त्र आहे... मृत्युसमयी हे इथेच विसर्जन होणार आहे , पण आपले कर्म आपल्या आत्म्याचे चांगले किंवा वाईट भोग ठरवणार आहेत (प्रारब्ध)
म्हणुन.. Karma's neatness & cleanliness is Important !!
कुकर्म, कुवृत्ती , कुविचार हा मैला आधी धुतला पाहिजे...
अंघोळ केल्याने शरीर स्वच्छ होते; पण विचार, वाणी आणि कर्म शुद्ध असतील तरच मन पवित्र होते. आणि देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कदाचित याच अंतःकरणाच्या पवित्रतेतून जात असावा.
शरीराची स्वच्छता महत्त्वाची आहेच, पण मनाची स्वच्छता त्याहून अधिक महत्त्वाची आहे..!!
आता ती कशी करायची ह्यावर विचार करा...
सोचो... सोचो... सोचना तो पडेगा ...
: सचेतन 🌿🙏🏻
चेतन कोठावदे