Friday, June 5, 2020

वरुण आगमन..!

काल रातीच्या स्वप्नात 
झाले वरूणाचे आगमन
भिजवूनी गेला सृष्टी सारी
ऐन निद्रेच्या कुशीत..

जागी झाली पर्णवेली
पायवाटा जाग्या झाल्या
जागी झाली ओहोळवाट
वृक्षलता जाग्या झाल्या..

बळीराजा झाला मोदित
हर्ष मावेना गगनात..
दिवा कृतज्ञतेचा तेवून
समिप दात्याच्या जोडी हात..

घट्ट बिलगली बीजाला
बांधावरली माती..
"बघ आला कैवारी आपुला
कसलेच आता भय नाही"

छतावर तुझे थिरकने..
भासे एकांतातील गाणे
जणू आरोहातील लय..
अन् तिरकीट तालमय

तुझ्या आगमनात 
धो धो जलधारा..
चातका मनी दाटे
निश्र्वास वारा.‌.

वारा गाई तुझे गाणे..
विद्दुलेसव तुझे येणे..

करटुली शिराळी
तुझ्या प्रेमात पिवळी,
स्वागतास कदंब कर्दळी 
नटली सुंदर रानहळदी

आगमनाने तुझ्या 
सृष्टी सारी जागली
स्वप्नभेट आशादायी
अवघी सत्यात उतरली

तुच विठ्ठल , तुच सखा
तुच जीवांचा प्राणदाता
तुच अमृत , तुच औषधी
तुजविन जीवन असंभव..!

-चेतन कोठावदे