जाणीवेला शब्द दे
शब्दांमधुनी भाव घे,
शब्दवेड्या पाखराला
तू सदैव साद दे!!
माणुसकीच्या रंध्रातून
कृतज्ञतेचा वेध घे,
दुरितांचे तीमिर जावो
हीच वंद्य हाक दे!!
चैतन्याच्या लहरींतून
नवनिर्मितीची आस घे,
जीर्ण जाहल्या खापरांतून
जळमटांना मोक्ष दे !!
सरू दे अंधार सारा
नवदीप आता तेजू दे,
पूर्वगाठी संचितांचे
रूदन आता संपू दे!!
समीप भासतो अंत जेथे
तेथे तुहा सहवास दे,
भित्तिकेवरले चित्र तुझे
चित्ती संजीवन होवू दे!!
- चेतन कोठावदे