नको मज पैका तुझा
भजे मुखी नाम हरी
भाव वसो तुझा निर्मळ
करिता पंढरीची वारी!
नको नुसते होणे तुझे
नाद -- नामात रे दंग,
भाव बुद्धीने घे उमजून
ज्ञानियांचा भक्ती रंग!
सुख दुःख रे जाणाया
उभा ठाकलो मी अचल
उगा नको होवू लाचार
मनी ठेवत वेदनेची सल!
हिंडतात जगी काही
व्यर्थ मिरवीत हरी,
जाण जात दांभिकाची
सोडी संग रे सत्वरी !
माझ्या तुक्याने लिहियले
अभंग रसाळ तात्विक,
करिता चिंतन तयांचे
होईल जीवन सात्त्विक !
बुक्का लावून ललाटी
नको पोसू मनी पाप,
ठेविलें मी कटेवरी हात !
हरण्या तुझे सारे ताप
भीतीतून नको भक्ती ,
भर प्रितीची घागर
टाळ मृदुंग वाजवीत
कर संत विचार जागर!
या चंद्रभागेच्या तीरावर
येतो आषाढीला महापूर,
जीवाशिवाच्या भेटीस
मी 'तुझा विठ्ठल'आतुर!
सोहळा आनंदी पाहून
होते चित्त माझेही दंग!
यावी जरा सोडून वीट
मस्त नाचावे तुझ्या संग !
नको मज पैका तुझा...
भले, नको करू वारी...
ज्याच्या मुखी नाम हरी
दिसे त्यास स्वप्नात पंढरी
हाक तुझी रे ऐकता
मी धावत येईन सत्वरी !
घेऊनी तुला डोईवरी
होईल मी ही वारकरी..!!
*- चेतन कोठावदे*
*पुणे, ९०२८२४९६७१*