Monday, February 24, 2020

शतदा वंदन

देह घेऊन आलो होतो,
तुम्ही विवेकी स्पर्श दिला
भाव मनीचे स्पर्शउनि,
तुम्ही मानव्याला जन्म दिला

कोण अर्जुन कैसा कृष्ण?
विसर आम्हा पडला होता,
अहंतेच्या वृथा गप्पा-
छंद होऊनि बसला होता

पाषाण जाहल्या हृदयामधुनि
कुसुम गीतेचे तुम्ही फुलविले,
चक्रधारी जय योगेश्वराला
मनामनातुनी उभे केले !

व्यास वाल्मीकि विचारांचा
यज्ञ तुम्ही उभारला,
ऋषीस्मरण करवुनी दादा;
जगी वेदमंत्र दिधला

अष्टकांचे घेऊनी गान मुखी
भावगंगेतूनी कृष्ण न्हाला,
उत्क्रांतिचा मार्ग 'स्वाध्याय'
नव्याने आम्ही गिरविला

कधी वृक्षातूनी देव जागविला
कधी मूर्तिपूजेतूनी भेटविला,
तुमच्या रुपात दादा-
देवदूतच आम्हासी गवसला।

सोहळा कृतज्ञतेचा करोनि
गौरव मनुष्याचा साकारला
शतशः वंदन तुम्हास दादा!
शतशः वंदन तुम्हास दादा!!
तुम्ही मनुष्य (पुन्हा) उभा केला.

- चेतन कोठावदे

3 comments: