Tuesday, April 6, 2021

छोटी लेखमाला : शिवाजी जन्मावा पण दुसऱ्याच्या घरी??

छोटी लेखमाला

 विषय : शिवाजी जन्मावा पण दुसऱ्याच्या घरी??

    ज्या मातीला एके काळी स्वराज्याचा निस्वार्थ आणि कर्मयोगी यौवनाचा सुगंध होता, तिथेच आत्ता अहंतेत पिचलेल्या आणि बेधुंद नशेत हरवलेल्या 'स्व केंद्रित' भोगवादाचा दुर्गंध येत आहे.

थोडा आपणच विचार करूया..

महाराजांचे नुसते जन्मोत्सव, पुण्यतिथी साजरे करून काय होणार ? शिवाजी महाराजांचे नुसते पुतळे घरात पुजून काय होणार ?

शिवाजी जन्मावा!! ..पण दुसऱ्याच्या घरात ; ही वृत्ती परिवर्तन कसं घडवून आणणार ?

राजांच्या ठायी असलेली, माणसातील देव (कौशल्य) हेरून त्यात नवचैतन्य स्फुरवणारी चेतना आपल्यात आहे  कुठे ?

हा कुणबी,तो महार, हा हिंदू, तो ब्रम्हण, तो मुसलमान ही निकस जाती पाती अन् धर्म व्यवस्था शिरोधारी मानणारे आपण कसली एकछत्री व्यवस्था निर्माण करणार ?

तो सरळ तर मी सरळ? तो कपटी तर मी सात कपटी... अशी बुरसटलेली विचारसरणी घेऊन आपण सर्वसमावेशक बनण्याचा आव तरी कसा आणणार ??

  छोट्या छोट्या प्रलोभनांना बळी पडणारे , जीवनात कसलाही निर्धार नसणारे , सत्याची Adjustable  कास धरणारे, एखाद्या उदात्त तत्त्वासाठी थोडेही समर्पण दाखवण्याची तयारी नसणारे... केवळ रामराज्याची किंवा शिव- स्वराज्याची निरर्थक अपेक्षा करू शकतात.पण भावी पिढ्यांसाठी थोडेफार आदर्शवत जीवन जगण्याची हिम्मत का नाही करू शकत?

  अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले हे आपले राजे एक माणूसच होते.. पणं एक सामान्य राजपुत्र ते 'छत्रपती' हा त्यांचा प्रवास म्हणजे "देहापासून देवत्वाकडे" जाण्याची प्रचीती आहे.

  ते सिंह बनू शकले!, ते अवघ्या १६ व्या वर्षी स्वराज्यासाठी समर्पनाचा निर्धार करू शकले, ते उत्तम अभ्यासक बनू शकले, गड किल्ले ह्यांचं भौगोलिक अंदाज घेऊन युद्धे जिंकू शकले, सर्वसमावेशक वृत्तीने एक एक हृदय जखडू शकले, माता भगिनींचे बालकांचे पोशिंदे बनू शकले, पराक्रम आणि प्रेम दोन्ही साकारू शकले, .... अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांना नेहमीच सर्वश्रेष्ठ ठरवतात.

पण थोडा विचार करा ते हे कसे करू शकले?

कारण; त्यांना स्वत्वाची ओळख झाली होती!

"कस्त्वं कोऽहं कुत आयातः का मे जननी को मे तातः।" (मी कोण? माझा जन्म कशासाठी? मी कोणाचा?)

ह्या गोष्टीवर बालपणीच चिंतन करून , यथायोग्य गोष्टींचा त्यांनी ध्यास घेतला. राम आणि कृष्ण तर जणू त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक निर्णयात सहभागी दिसले... कारण तसेच बाळकडू त्यांना मिळाले!

  "शिवोहं !", "अहं ब्रह्मास्मि !" ह्या तत्वांचा चिंतन केल्यावर आपल्यालाही आपल्यातील त्या सुप्त चैतन्याच्या उलगडा होऊ शकतो..!! मग साहस, धैर्य, क्षमाशीलता, आत्मविश्वास नेतृत्वगुण हे राजांच्या जीवनात असलेले गुण आपल्याही जीवनात प्रत्ययाला येऊ लागतील. पण त्यासाठी आपण अशा समर्पक किती गोष्टी जीवनात आंगीकारतो? आणि त्यासाठी आपण किती विधायक मार्गांच अनुसरण करतो? किती आग्रही भूमिका घेतो, आणि नको त्या गोष्टीचा त्यागाची तयारी ठेवतो..? हा वैयक्तिक चिंतनाचाच विषय आहे.

आपल्या ठायी जेव्हा स्वत्वाची अनुभूती पक्की होईल, तेव्हा "I CAN DO, I CAN CHANGE" ही वृत्ती तयार होईल, हे मात्र खरं !!

- चेतन कोठावदे

17 comments:

  1. जय शिवराय ...सहमत

    ReplyDelete
  2. अप्रतिम लेखन👌👌👌

    ReplyDelete
  3. Nice article and thinking behind it ! Keep up the good work.

    ReplyDelete
  4. छान लेख चेतन भाऊ

    ReplyDelete
  5. खूप छान चेतन. अतिशय समर्पक..

    ReplyDelete
  6. "हर हर महादेव",या जयघोषात जी ऊर्जा आहे.
    तीच ऊर्जा या लेखातून मिळाली.
    धन्यवाद चेतन.

    ReplyDelete
  7. तरूण पिढीसाठी खूप प्रेरणादायी आहे. छान लेख

    ReplyDelete
  8. अगदी बरोबर- शिवाजी जन्मावा!! ..पण दुसऱ्याच्या घरात ; ही वृत्ती परिवर्तन कसं घडवून आणणार ?

    ReplyDelete