Wednesday, June 30, 2021

छोटी लेखमाला : गुण पारखता

 छोटी लेखमाला : गुण पारखता

एका सुदृढ मनोवृत्ती असलेल्या कलाकाराचे लक्षण  कोणती :- 

अनेक लक्षणांपैकी खालील काही ठळक;

जी काही आजवर सरस्वती प्रसन्न आहे त्याबद्दल तो परमेश्वराचे आणि सर्व गुरुजनांचे सदैव कृतज्ञता भाव मनात जपतो.

भगवंताने प्रत्येकाच्या ठाई काही विशेष गोष्टींचे संकलन केलेले आहे ही बाब तो नेहमी शिरोधरी ठेवून सर्वांचा सन्मान करतो आणि अवहेलना टाळतो आणि भेकड निंदेला तो कधीच भीत नाही.

दुसऱ्यांच्या कलेला किंवा व्यक्त होण्याच्या विधायक प्रयत्नाला तो नेहमीच प्रोत्साहन देतो.आणि मोठ्या मनाने त्यांचे कौतुक करण्यात अजिबात कंजुषी करत नाही. कारण; तो हे जाणून असतो की छोट्या छोट्या शाबासकीतून च कुठलाही कलाकार मोठा होत जातो आणि त्याला सतत नवी कल्पना प्रत्यक्षात आणण्याची ऊर्मी मिळते. 

समोरच्या व्यक्तीमध्ये तो नेहमी काही अंतर्भूत लपलेले कौशल्य आणि त्यातील गुणांना तो सहजगत्या परखतो.

तो सर्वसमावेशक वृत्तीचा असतो, पण केवळ फेम साठी काम करणाऱ्यापासून तो जरा दूर राहणेच पसंत करतो.

स्वतःच्या कलेविषयी बढाया न मारता समोरच्या छोट्या मोठ्या साऱ्या व्यक्तिमत्वातून नवीन काय शिकता येईल यासाठी प्रयत्नशील असतो.

आत्मविश्वास, ईशविश्वास आणि नम्र भाव हे त्याचे अत्यंत महत्वाचे पैलू असतात.

"साधना हा एकच मार्ग!" ह्या तत्वावर त्याचा दृढ विश्वास असतो.

(छोटी लेखमाला : गुण पारखता)

- चेतन कोठावदे


Wednesday, June 2, 2021

जागर अजून बाकी आहे !

 बलात्काराने जातात जेथे निष्पाप बळी

  अनीतीने होते जेथे धर्माची होळी,

  समाजास पडला जेथे संस्कृतीचा विसर

होवूद्या नव्याने तेथे कृष्ण विचारांचा जागर!


  पैक्यासाठी ज्यांनी ईमान विकले

खुर्चीसाठी अहोरात्र स्वदेशासच लुटले,

स्वार्थापायी पडला जेथे भगव्याचाही विसर

 होवूद्या नव्याने तेथे शिवगर्जनेचा जागर!


    हवी कशाला आज चित्तसाधना?

गाठी असता मकान , कपडा आणि दाणा,

  भोगापायी पडला जेथे गीताईचा विसर

होवूद्या नव्याने तेथे आज ज्ञानियांचा जागर!


 सर्रास होतात जेथे मानव्याच्या कत्तली

बंदुकीच्या जोरावर दहशतीच्या नक्कली,

 सत्तेपायी पडला ज्यांना अंदमानचा विसर

होवूद्या नव्याने तेथे स्वतंत्र सावरकरांचा जागर!


'अहंतेच्या वृथा गप्पा' ज्यांनी हेच छंद जोपासले

 रंजल्या गांजल्यांस मग कुणी म्हणावे आपुले?

 "इदं न मम" चा जेथे पडला असे विसर

होवूद्या नव्याने तेथे राम तुक्याचा जागर!



कुठे कुणाचे काय जाते?,

महापुरुषांच्या नावाने; सारे रस्ते मात्र जागते!!

कुणास ठाऊक?, कुणी जाणली किती व्यथा त्यांची.?

पण जागर होणे मात्र अजून बाकी आहे..!


- चेतन कोठावदे