Wednesday, June 2, 2021

जागर अजून बाकी आहे !

 बलात्काराने जातात जेथे निष्पाप बळी

  अनीतीने होते जेथे धर्माची होळी,

  समाजास पडला जेथे संस्कृतीचा विसर

होवूद्या नव्याने तेथे कृष्ण विचारांचा जागर!


  पैक्यासाठी ज्यांनी ईमान विकले

खुर्चीसाठी अहोरात्र स्वदेशासच लुटले,

स्वार्थापायी पडला जेथे भगव्याचाही विसर

 होवूद्या नव्याने तेथे शिवगर्जनेचा जागर!


    हवी कशाला आज चित्तसाधना?

गाठी असता मकान , कपडा आणि दाणा,

  भोगापायी पडला जेथे गीताईचा विसर

होवूद्या नव्याने तेथे आज ज्ञानियांचा जागर!


 सर्रास होतात जेथे मानव्याच्या कत्तली

बंदुकीच्या जोरावर दहशतीच्या नक्कली,

 सत्तेपायी पडला ज्यांना अंदमानचा विसर

होवूद्या नव्याने तेथे स्वतंत्र सावरकरांचा जागर!


'अहंतेच्या वृथा गप्पा' ज्यांनी हेच छंद जोपासले

 रंजल्या गांजल्यांस मग कुणी म्हणावे आपुले?

 "इदं न मम" चा जेथे पडला असे विसर

होवूद्या नव्याने तेथे राम तुक्याचा जागर!



कुठे कुणाचे काय जाते?,

महापुरुषांच्या नावाने; सारे रस्ते मात्र जागते!!

कुणास ठाऊक?, कुणी जाणली किती व्यथा त्यांची.?

पण जागर होणे मात्र अजून बाकी आहे..!


- चेतन कोठावदे


No comments:

Post a Comment