Thursday, July 30, 2020

बाप..."

बाप म्हणजे ओळख,
  सृष्टीतल्या साऱ्या घटकांशी

बाप म्हणजे अस्तित्व,
  श्र्वसांच, धडधडणाऱ्या काळजाशी

बाप म्हणजे प्रेम,
 आदरयुक्त जिव्हाळा जपण्यासाठी

बाप म्हणजे वाटाड्या,
 कधी वाटा न चुकण्यासाठी

बाप म्हणजे धाक् ,
 शिस्त आणि शासन वळण्यासाठी!
 
बाप म्हणजे प्रेरणा,
 अभेद्य पुरुषार्थ जागवण्यासाठी!!

बाप म्हणजे बंधन,
 वाहवत जाणाऱ्या यौवनासाठी!!

बाप म्हणजे भिंत,
 मायेने अासरा देण्यासाठी!!

 बाप म्हणजे आदर्श,
   दिवास्वप्न साकारण्यासाठी!

बाप असतो, नेहमी रहातो!
 आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत!
 आपल्याला तेवत ठेवण्यासाठी..!
 
- चेतन कोठावदे

Friday, July 10, 2020

क्रोधज्वाळा😡😷

कटू भावनांचे रक्तरंजित सडे
गेले ओलांडून संयमाचे धडे!
मग्रूरतेत करी तो घाव आंधळा
कारण त्याचा क्रोध पांगळा!

उसवित जातो जहाल शब्द
गुंफण सुंदर नात्यांची,
बीभत्स तांडव करून येतो
उधळण अविवेकी क्षणांची!

अनावर जाहल्या क्रोधज्वाळा 
भाव भस्म करून जातो,
जाता जाता ठेवुनी येतो
कठोरतेच्या दाहक खुणा!!

सरतेशेवटी उरतो फक्त
पश्चात्तापाचा घडा!!
गीरवित बसतो उरले जीवन
निराशेचा पाढा!!

संयमाने जीवन फुलते
क्रोध स्वयंभू करू नये!
रुक्षतेचा शाप भारी
क्रोधाग्नीत जळू नये!

- चेतन कोठावदे








Thursday, July 2, 2020

विठ्ठलच झाला वारकरी!

नको मज पैका तुझा
भले, नको करू वारी
भाव वसो तुझा निर्मळ
हे एकची माझे मागणे !

सुख दुःख तुझे जाणाया
उभा ठाकलो मी येथेच
उगा नको होवू लाचार
ठेवत मनी वेदनेची सल!

व्यर्थ मिरवीत हरी
हिंडतात जगी काही,
जाण जात दंभिकाची
सोडी संग सत्वरी !

माझ्या तुक्याने लिहिले
अभंग रसाळ तात्विक,
करिता चिंतन तयांचे
होईल जीवन सात्त्विक !

बुक्का लावून ललाटी
नको पोसू मनी पाप,
हरण्या तुझे सारे ताप
ठेविलें मी कटेवरी हात !

नको मज पैका तुझा
भले, नको करू वारी
नित्य लाभू दे सहवास मज
तुझ्या निश्चल मानसि
हे एकची माझे मागणे !!

नको मज पैका तुझा...
भले, नको करू वारी...
अविचल निस्सीम भक्तीसाठी
होईल मी ही वारकरी..!!
होईल मी ही वारकरी..!!

- चेतन कोठवदे