कटू भावनांचे रक्तरंजित सडे
गेले ओलांडून संयमाचे धडे!
मग्रूरतेत करी तो घाव आंधळा
कारण त्याचा क्रोध पांगळा!
उसवित जातो जहाल शब्द
गुंफण सुंदर नात्यांची,
बीभत्स तांडव करून येतो
उधळण अविवेकी क्षणांची!
अनावर जाहल्या क्रोधज्वाळा
भाव भस्म करून जातो,
जाता जाता ठेवुनी येतो
कठोरतेच्या दाहक खुणा!!
सरतेशेवटी उरतो फक्त
पश्चात्तापाचा घडा!!
गीरवित बसतो उरले जीवन
निराशेचा पाढा!!
संयमाने जीवन फुलते
क्रोध स्वयंभू करू नये!
रुक्षतेचा शाप भारी
क्रोधाग्नीत जळू नये!
- चेतन कोठावदे
No comments:
Post a Comment