Friday, November 26, 2021
युवा हो, लढकर दिखाओ!
Sunday, August 15, 2021
निर्विघ्नं कुरू मे देव !
बाप्पांना देऊन पहिला मान
राखुया सारे निसर्ग भान..!!
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा।।
आपल्या संस्कृतीतले सर्व उत्सव हे जीवनात उत्साह, आनंद घेऊन येतात, सकारात्मक ऊर्जा , आशादायी विचार घेऊन येतात. त्यापैकीच एक महत्वाचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव!!
आपल्या जीवनातील सर्व कार्य सुरळीत, आणि निर्विघ्न पार पाडावीत, सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी नांदावी; ह्यासाठी दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण गणपती बाप्पाला प्रार्थना करतो.
ह्या उत्सवाच्या परंपरेनुसार आपण १० दिवस बाप्पांचे पूजन करतो आणि अनंत चतुर्दशीला मूर्ती विसर्जन करून ह्या उत्सवाचा समारोप करतो.
पण ; ह्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणारे गणपती मूर्तींचे विसर्जन मोठ्या प्रमाणात जल- प्रदूषणाचे कारण ठरत आहे...
"निर्विघ्न कुरुमे देव" अशी प्रार्थना ज्या देवाला आपण करतो त्याचाच उत्सव हा आपल्या काही चुकीच्या वर्तणुकिमुळे आपल्याच जीवनात विघ्नाचे कारण ठरावा हे आपल्याला आवडेल का???
POP प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या गणेश मूर्ती मध्ये प्लास्टिक आणि सिमेंट च्या मिश्रणाचा वापर केला जातो, त्यामुळे साहजिकच ह्या मूर्तींच्या विसर्जनानंतर त्यांचे पुर्णतः विघटन होत नाही, किंबहुना ह्या विसर्जन केलेल्या मुर्त्या वर्षानुवर्षे तलावातून नदीत आणि मग समुद्रात अशा प्रवाहित होत जातात.
PoP मध्ये कॅल्शियम सल्फेट हेमिहैड्रेट (calcium sulphate Hemihydrate) असल्यामुळे पाण्यात विरघळण्यासाठी त्याला अनेक वर्ष लागतात. समुद्रातील जीवसृष्टीचे जीवन त्यामुळे धोक्यात येत आहे.
ह्या मुर्त्यांमध्ये जे रंग वापरले जातात ते विषारी रसायनांपासून बनवलेले असतात आणि त्यामुळे समुद्रातील माश्यांचे, विविध जलचर जीवांचे जीवन संपुष्टात येत आहे.
जल प्रदूषणास कारणीभूत ह्या मुर्त्यांमुळे शेवटी आपल्या रोजच्या वापरातील पाण्यातील प्रदूषणाची पातळी (acidic level) वाढली आहे. त्यामुळे विविध त्वचा रोग, पोटाचे विकार वाढले आहेत.
वरील सर्व दुष्परिणाम आणि निसर्गाची होणारे नुकसान लक्षात घेता, आपल्याला निसर्गाची हानी टाळण्यासाठी आणि आरोग्य संतुलन राखण्यासाठी योग्य पर्यायांची निवड करणे ही आता काळाची गरज आहे..!
म्हणून आता गणपतीची मूर्ती घेताना केवळ आकर्षकता आणि आर्थिक मूल्य हे दोन हेतू लक्षात घेऊन चालणार नाही; तर निसर्गाचे रक्षण (निसर्गाला हानी होणार नाही) हा महत्वाचा मुद्दा लक्षातच ठेवला पाहिजे.
आपण ही हानि कशी टाळू शकतो?
शाडू माती किंवा लाल माती बाजारात उपलब्ध आहे, तिचा वापर करून घरगुतीच गणपती बनवण्याचे कौशल्य आत्मसात करुया.
गणपती मूर्तीला सुशोभीकरण करण्यासाठी केमिकल विरहित रंगांचा वापर करुया.
गणेश मूर्ती बाजारातून विकत घ्यायची असल्यास शाडू माती चे गणपती , किंवा नदी पात्रातील लाल माती ने बनवलेल्या मूर्ती ह्या१००% eco-friendly पर्यायांना प्राधान्य देऊया.
"घरगुती विसर्जन सोहळा!"
अनंत चतर्दशीला विसर्जनाच्या वेळी घरीच एखाद्या कुंडीत गणेश मूर्तीचे विसर्जन करुया आणि नंतर त्या कुंडीत छानसे रोपटे लावून त्याची नियमित आवश्यक ती निगा राखूया.
सार्वजनिक ठिकाणी विसर्जन!
निर्माल्य, फळे/फुले/हार हे जरी निसर्गतः विघटन होणारे असेल तरी ते नदी पत्रात न फेकता प्रशासनाने ठरवून दिलेल्या "निर्माल्य संकलन" ठिकाणी जमा करुया. तसेच Single Used Plastic सुद्धा इतरत्र न फेकता कचरा संकलन केंद्रात देऊयात.
विसर्जनाच्या वेळी POP मूर्ती ही तलावात किंवा नदीत विसर्जित न करता, प्रशासनाने नेमून दिलेल्या किंवा स्वयंसेवी संस्थांनी नेमलेल्या जागेतच संकलन करुया.
बुद्धीच्या ह्या देवतेचे आत्ता निर्बुद्धपणे पूजन न करता, निसर्गाला अपाय होणार नाही ह्याची दक्षता घेऊयात!
निसर्गाला अपाय म्हणजेच, संपूर्ण जीव सृष्टीला अपाय हे कटाक्षाने लक्षात ठेवूया.
आजपर्यंत निसर्गात भोगाची दृष्टी घेऊन जगणाऱ्या आपल्या मानवजातीला आता डोळसपणे निस्वार्थ वृत्तीने निसर्गाच्या संवर्धनासाठी एकनिष्ठ होण्याची गरज आहे.
उशीर झालेला आहे, पण अजूनही वेळ हातात आहे..!
जागे होवूया, निसर्ग वाचवूया!!
- चेतन कोठावदे
Sunday, July 4, 2021
विठ्ठलाची मागणी
नको मज पैका तुझा
भजे मुखी नाम हरी
भाव वसो तुझा निर्मळ
करिता पंढरीची वारी!
नको नुसते होणे तुझे
नाद -- नामात रे दंग,
भाव बुद्धीने घे उमजून
ज्ञानियांचा भक्ती रंग!
सुख दुःख रे जाणाया
उभा ठाकलो मी अचल
उगा नको होवू लाचार
मनी ठेवत वेदनेची सल!
हिंडतात जगी काही
व्यर्थ मिरवीत हरी,
जाण जात दांभिकाची
सोडी संग रे सत्वरी !
माझ्या तुक्याने लिहियले
अभंग रसाळ तात्विक,
करिता चिंतन तयांचे
होईल जीवन सात्त्विक !
बुक्का लावून ललाटी
नको पोसू मनी पाप,
ठेविलें मी कटेवरी हात !
हरण्या तुझे सारे ताप
भीतीतून नको भक्ती ,
भर प्रितीची घागर
टाळ मृदुंग वाजवीत
कर संत विचार जागर!
या चंद्रभागेच्या तीरावर
येतो आषाढीला महापूर,
जीवाशिवाच्या भेटीस
मी 'तुझा विठ्ठल'आतुर!
सोहळा आनंदी पाहून
होते चित्त माझेही दंग!
यावी जरा सोडून वीट
मस्त नाचावे तुझ्या संग !
नको मज पैका तुझा...
भले, नको करू वारी...
ज्याच्या मुखी नाम हरी
दिसे त्यास स्वप्नात पंढरी
हाक तुझी रे ऐकता
मी धावत येईन सत्वरी !
घेऊनी तुला डोईवरी
होईल मी ही वारकरी..!!
*- चेतन कोठावदे*
*पुणे, ९०२८२४९६७१*
Wednesday, June 30, 2021
छोटी लेखमाला : गुण पारखता
छोटी लेखमाला : गुण पारखता
एका सुदृढ मनोवृत्ती असलेल्या कलाकाराचे लक्षण कोणती :-
अनेक लक्षणांपैकी खालील काही ठळक;
जी काही आजवर सरस्वती प्रसन्न आहे त्याबद्दल तो परमेश्वराचे आणि सर्व गुरुजनांचे सदैव कृतज्ञता भाव मनात जपतो.
भगवंताने प्रत्येकाच्या ठाई काही विशेष गोष्टींचे संकलन केलेले आहे ही बाब तो नेहमी शिरोधरी ठेवून सर्वांचा सन्मान करतो आणि अवहेलना टाळतो आणि भेकड निंदेला तो कधीच भीत नाही.
दुसऱ्यांच्या कलेला किंवा व्यक्त होण्याच्या विधायक प्रयत्नाला तो नेहमीच प्रोत्साहन देतो.आणि मोठ्या मनाने त्यांचे कौतुक करण्यात अजिबात कंजुषी करत नाही. कारण; तो हे जाणून असतो की छोट्या छोट्या शाबासकीतून च कुठलाही कलाकार मोठा होत जातो आणि त्याला सतत नवी कल्पना प्रत्यक्षात आणण्याची ऊर्मी मिळते.
समोरच्या व्यक्तीमध्ये तो नेहमी काही अंतर्भूत लपलेले कौशल्य आणि त्यातील गुणांना तो सहजगत्या परखतो.
तो सर्वसमावेशक वृत्तीचा असतो, पण केवळ फेम साठी काम करणाऱ्यापासून तो जरा दूर राहणेच पसंत करतो.
स्वतःच्या कलेविषयी बढाया न मारता समोरच्या छोट्या मोठ्या साऱ्या व्यक्तिमत्वातून नवीन काय शिकता येईल यासाठी प्रयत्नशील असतो.
आत्मविश्वास, ईशविश्वास आणि नम्र भाव हे त्याचे अत्यंत महत्वाचे पैलू असतात.
"साधना हा एकच मार्ग!" ह्या तत्वावर त्याचा दृढ विश्वास असतो.
(छोटी लेखमाला : गुण पारखता)
- चेतन कोठावदे
Wednesday, June 2, 2021
जागर अजून बाकी आहे !
बलात्काराने जातात जेथे निष्पाप बळी
अनीतीने होते जेथे धर्माची होळी,
समाजास पडला जेथे संस्कृतीचा विसर
होवूद्या नव्याने तेथे कृष्ण विचारांचा जागर!
पैक्यासाठी ज्यांनी ईमान विकले
खुर्चीसाठी अहोरात्र स्वदेशासच लुटले,
स्वार्थापायी पडला जेथे भगव्याचाही विसर
होवूद्या नव्याने तेथे शिवगर्जनेचा जागर!
हवी कशाला आज चित्तसाधना?
गाठी असता मकान , कपडा आणि दाणा,
भोगापायी पडला जेथे गीताईचा विसर
होवूद्या नव्याने तेथे आज ज्ञानियांचा जागर!
सर्रास होतात जेथे मानव्याच्या कत्तली
बंदुकीच्या जोरावर दहशतीच्या नक्कली,
सत्तेपायी पडला ज्यांना अंदमानचा विसर
होवूद्या नव्याने तेथे स्वतंत्र सावरकरांचा जागर!
'अहंतेच्या वृथा गप्पा' ज्यांनी हेच छंद जोपासले
रंजल्या गांजल्यांस मग कुणी म्हणावे आपुले?
"इदं न मम" चा जेथे पडला असे विसर
होवूद्या नव्याने तेथे राम तुक्याचा जागर!
कुठे कुणाचे काय जाते?,
महापुरुषांच्या नावाने; सारे रस्ते मात्र जागते!!
कुणास ठाऊक?, कुणी जाणली किती व्यथा त्यांची.?
पण जागर होणे मात्र अजून बाकी आहे..!
- चेतन कोठावदे
Wednesday, May 19, 2021
'तू ही है संग हमारे'
धुन बजाओ कुछ कान्हा ऐसी,
की मन पावन हो जाये...!!
सूर संगम कुछ कर दो ऐसा,
की तन स्वरगंगा मे नहाये..!!
शिश झुकाऊ चरणोमे तेरे
तो जीवन तेरा बन जाये!!
न आये कभी हमे निराशा
भले घना अंधेरा छा जाये
होंगे दुःख हजारो चारो ओर
चाहे गीरे हमपे तुफानी लेहर,
तू कृष्ण बनके सारथ्य कर
तू आशा बनके मनमें झलक
यही खुमारी है अब दिलमें;
की, 'तूही है संग हमारे',
है जटील यह संसार लेकीन;
जो तुम हो खडे, तो हम क्यो डरे?
- चेतन कोठावदे
थोडा सब्र रख तू..
अजून बोलण्यासारखे
बरेच काही बाकी आहे
थोडा सब्र रख तू..
जीवनमध्ये गोडवा भरणे ,
अजून बाकी आहे..!!
दुःख थोडे परके होत नाही,
तर लगेच सुख कुठून आणू
जरा आत्ता मिळाला विसावा;
नवी सर्कस तुझसाठी कशी थाटू??
खेळ तर आत्ताच झालाय सुरू…
अजून बाजी मारणे बाकी आहे
थोडा सब्र रख तू..यार,
जीवनमध्ये गोडवा भरणे
अजून बाकी आहे..
आत्ताच कुठे पानांनी फुलांना
उगवण्यासाठी जागा दिली,
लगेच कसे त्यांना खुडून
म्हणे देऊ देवाला वाहून
उगाच नुसते शब्द रखडून
त्याला कविता कशी म्हणू??,
होवुदे स्पर्श प्रतिभेचा त्यांना
उत्सफुर्त शहारे मिळू दे भावनांना!
ऐट मिरवीत येतात रुसवे फुगवे,
त्यांनाही संयमाची चौकट घालू
थोडा सब्र रख ये जिंदगी..
अजून बराच काळ अबोध आहे !
अजून बोलण्यासारखे
बरेच काही बाकी आहे
थोडा सब्र रख ये जिंदगी
जीवनमध्ये गोडवा भरणे ,
अजून बाकी आहे..!!
- चेतन कोठावदे
Tuesday, April 6, 2021
छोटी लेखमाला : शिवाजी जन्मावा पण दुसऱ्याच्या घरी??
छोटी लेखमाला
विषय : शिवाजी जन्मावा पण दुसऱ्याच्या घरी??
ज्या मातीला एके काळी स्वराज्याचा निस्वार्थ आणि कर्मयोगी यौवनाचा सुगंध होता, तिथेच आत्ता अहंतेत पिचलेल्या आणि बेधुंद नशेत हरवलेल्या 'स्व केंद्रित' भोगवादाचा दुर्गंध येत आहे.
थोडा आपणच विचार करूया..
महाराजांचे नुसते जन्मोत्सव, पुण्यतिथी साजरे करून काय होणार ? शिवाजी महाराजांचे नुसते पुतळे घरात पुजून काय होणार ?
शिवाजी जन्मावा!! ..पण दुसऱ्याच्या घरात ; ही वृत्ती परिवर्तन कसं घडवून आणणार ?
राजांच्या ठायी असलेली, माणसातील देव (कौशल्य) हेरून त्यात नवचैतन्य स्फुरवणारी चेतना आपल्यात आहे कुठे ?
हा कुणबी,तो महार, हा हिंदू, तो ब्रम्हण, तो मुसलमान ही निकस जाती पाती अन् धर्म व्यवस्था शिरोधारी मानणारे आपण कसली एकछत्री व्यवस्था निर्माण करणार ?
तो सरळ तर मी सरळ? तो कपटी तर मी सात कपटी... अशी बुरसटलेली विचारसरणी घेऊन आपण सर्वसमावेशक बनण्याचा आव तरी कसा आणणार ??
छोट्या छोट्या प्रलोभनांना बळी पडणारे , जीवनात कसलाही निर्धार नसणारे , सत्याची Adjustable कास धरणारे, एखाद्या उदात्त तत्त्वासाठी थोडेही समर्पण दाखवण्याची तयारी नसणारे... केवळ रामराज्याची किंवा शिव- स्वराज्याची निरर्थक अपेक्षा करू शकतात.पण भावी पिढ्यांसाठी थोडेफार आदर्शवत जीवन जगण्याची हिम्मत का नाही करू शकत?
अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले हे आपले राजे एक माणूसच होते.. पणं एक सामान्य राजपुत्र ते 'छत्रपती' हा त्यांचा प्रवास म्हणजे "देहापासून देवत्वाकडे" जाण्याची प्रचीती आहे.
ते सिंह बनू शकले!, ते अवघ्या १६ व्या वर्षी स्वराज्यासाठी समर्पनाचा निर्धार करू शकले, ते उत्तम अभ्यासक बनू शकले, गड किल्ले ह्यांचं भौगोलिक अंदाज घेऊन युद्धे जिंकू शकले, सर्वसमावेशक वृत्तीने एक एक हृदय जखडू शकले, माता भगिनींचे बालकांचे पोशिंदे बनू शकले, पराक्रम आणि प्रेम दोन्ही साकारू शकले, .... अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांना नेहमीच सर्वश्रेष्ठ ठरवतात.
पण थोडा विचार करा ते हे कसे करू शकले?
कारण; त्यांना स्वत्वाची ओळख झाली होती!
"कस्त्वं कोऽहं कुत आयातः का मे जननी को मे तातः।" (मी कोण? माझा जन्म कशासाठी? मी कोणाचा?)
ह्या गोष्टीवर बालपणीच चिंतन करून , यथायोग्य गोष्टींचा त्यांनी ध्यास घेतला. राम आणि कृष्ण तर जणू त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक निर्णयात सहभागी दिसले... कारण तसेच बाळकडू त्यांना मिळाले!
"शिवोहं !", "अहं ब्रह्मास्मि !" ह्या तत्वांचा चिंतन केल्यावर आपल्यालाही आपल्यातील त्या सुप्त चैतन्याच्या उलगडा होऊ शकतो..!! मग साहस, धैर्य, क्षमाशीलता, आत्मविश्वास नेतृत्वगुण हे राजांच्या जीवनात असलेले गुण आपल्याही जीवनात प्रत्ययाला येऊ लागतील. पण त्यासाठी आपण अशा समर्पक किती गोष्टी जीवनात आंगीकारतो? आणि त्यासाठी आपण किती विधायक मार्गांच अनुसरण करतो? किती आग्रही भूमिका घेतो, आणि नको त्या गोष्टीचा त्यागाची तयारी ठेवतो..? हा वैयक्तिक चिंतनाचाच विषय आहे.
आपल्या ठायी जेव्हा स्वत्वाची अनुभूती पक्की होईल, तेव्हा "I CAN DO, I CAN CHANGE" ही वृत्ती तयार होईल, हे मात्र खरं !!
- चेतन कोठावदे
Sunday, January 10, 2021
साद दे!!
जाणीवेला शब्द दे
शब्दांमधुनी भाव घे,
शब्दवेड्या पाखराला
तू सदैव साद दे!!
माणुसकीच्या रंध्रातून
कृतज्ञतेचा वेध घे,
दुरितांचे तीमिर जावो
हीच वंद्य हाक दे!!
चैतन्याच्या लहरींतून
नवनिर्मितीची आस घे,
जीर्ण जाहल्या खापरांतून
जळमटांना मोक्ष दे !!
सरू दे अंधार सारा
नवदीप आता तेजू दे,
पूर्वगाठी संचितांचे
रूदन आता संपू दे!!
समीप भासतो अंत जेथे
तेथे तुहा सहवास दे,
भित्तिकेवरले चित्र तुझे
चित्ती संजीवन होवू दे!!
- चेतन कोठावदे