Monday, October 12, 2020

मृत्यु शय्येवरी‌

शय्येवरी आता तू मृत्युच्या 

सांग अश्रू का ढाळतो..?

"काय केला मी गुन्हा?"

हा जाब कोठे पुसतो..?


प्रारब्धाचे भोग सारे

काय तूच एकटा भोगतो?,

जन्म जाहला ज्याक्षणी

मृत्यू तेथेच लिही 'तो'!!


कर्म केलेसि बलवत्तर जर

जाहली सुटका समज,

दवडला जन्म विलासे तर

मग देह धारीसी परत!


व्यर्थ नको रे शोक करणे

सोडी संसाराची आसक्ती

व्यर्थ न आता शोक करी

मनी राहुदे नाम हरी..!!

मनी राहुदे नाम हरी..!!


-चेतन


Tuesday, September 29, 2020

शताब्दी सुमन

जय योगेश्वर; नाही केवळ 
मंत्र ध्यानी मनी जपाचा,
इथे साधतो सहज समन्वय 
ज्ञान, कर्म, अन् भक्तीचा !

उन्नतीचा सात्विक मार्ग
स्वाध्यायाची हाक आर्त,
रोवून गेले पांडुरंगी दादा
ध्वज पंचरंगी क्रांतीचा !

तेज पताका लावून गेले
तिन्ही काळच्या संध्येची,
जाणीव आम्हा देऊन गेले
शांती, स्मृती, अन् शक्तीची

हीन दीन न येथ कोणी 
 "पुत्र सारे देवाचे" ,
पद्म फुलविले अमुच्या जीवनी
शतदा वंदन दादांचे !!

संस्कारांची देऊनी शिदोरी
ध्रुवासम बालकत्व दिले,
"धर्मं चर" चे गिरवीता धडे
लाभे नैतिकतेचे शिक्षण भले!

तीन 'त'कारी गुण सांगुनी
यौवनी शुद्ध प्राण फुंकले,
अविचल ध्येयवृद्धी पोषक 
गुण दर्शने चारित्र्य दिले

कृतज्ञतेचा दिवा तेववूनी
स्मरण करविले ऋषीसंतांचे,
संस्कृतीस्तव जन्म जयांचे
वंदावी ती ध्यासपंथी पाऊले !

कृतीभक्तीची मशाल घेऊनी
उभारली शाळा प्रयोगांची,
मत्स्यगंधा अन् वृक्षमांदिरी
भगवंताचे आम्ही पुजारी !

गावोगावी जाऊन आम्ही
पाईक होऊ रामाचे;
अन् बांधू सेतू संबंधांचे,
शिवोहमचा ध्यास धरुनी
होऊ वारस नचिकेताचे !

घेऊनी मुखी नाव प्रभूचे
गातो मंत्र उपनिषद् अष्टकांचे,
उंचावू जीवने गीता आचरूनी
होऊ;  सारे लाडके योगेश्वराचे

संकल्पांचे पुष्प वाहुनी
भाव भक्तीचे स्वर झंकारूनी,
साकार करतो आम्ही सारे..
दादा तुमची जन्मशातब्दी!!

दादा तुमची जन्मशातब्दी!!

-- चेतन कोठावदे

Sunday, August 23, 2020

पूजन हो गुण का..

मंगल की वो मूर्ती है,

चार भुजा धारी है

सबके दूख हारणे

धरती पर आयी है !


देख उसकी तेज को,

अज्ञान भय से कापता

देख उसकी चार भुजा,

दुष्ट भी है भागता!!


सृष्टी का वही श्री है,

स्वयंभू महाज्ञानी है

आदि अंत एक है..

ओंकार की गुंज है!!


मोरया है सन्मान जिनका 

और मूषक सवारी है,

सूक्ष्म को भी देख लेते

आंख उनकी तेज है !


नाम वक्रतुंड है,

दूर जिनकी शूंड है!

हर विघ्नको पढ सके 

ऐसी दूर उनकी सोच है!


उदर उसका लंब है

रहस्य जिसमे खोल है

स्थितप्रज्ञ उसको देख

लगे गीता साकार है..!


पूजन हो उनका

भक्ती श्रद्धा भाव से!

विकार त्याग के करो

स्वागत जल्लोश से!


बुद्धी की देवता को

न पूजना निर्बुद्धसा,

पूजन हो गुण का

नाही सिर्फ मूर्ती का!!


- चेतन कोठावदे

Friday, August 7, 2020

अचानक

 अशी नभांतुन , अचानक बरसावी..
 कडाडत गरजावी, वेदनेची वीज..!

असह्य संवेदनेतून ,भिनावे तिने ऊरी ..
चिरावे अंतरी, अंतरी आरपार

घेऊन तिने आठवणींच्या गावी जावे,
चिंब चिंब भिजवावे, वाहून गेलेले क्षण..

अन् एकटेच एकांती मज सोडून द्यावे,
भग्न स्वप्नांच्या वाटेवर हुरहुरण्यासाठी मन..!!

-चेतन कोठावदे

Wednesday, August 5, 2020

रात्रं-दिवस

रात्र सरकत जाते पुढे सुर्याला भेटाया,
स्वप्न दिव्य सोडुन मागे वास्तवात जगाया

तसाही कुठे अंधार बोलतो?...
दिवसातील कोलाहलच बरा वाटतो!

रात्र आपली करते गूज चंद्र तारकांशी,
दिवसाचा तर संवाद गुढ़; केवळ असतो स्वार्थाशी

रात्र आपली सोडून देते; चिंता सारी विश्वाची
दिवस मात्र राहतो तगमगत; निष्ठा ठेवत भाकरीशी 

रात्र असते मलम मऊ; क्षीण झालेल्या मनावरची..
दिवस मात्र रेंगाळतो, देह जाळीत मोहाभोवती!

-चेतन कोठावदे

Thursday, July 30, 2020

बाप..."

बाप म्हणजे ओळख,
  सृष्टीतल्या साऱ्या घटकांशी

बाप म्हणजे अस्तित्व,
  श्र्वसांच, धडधडणाऱ्या काळजाशी

बाप म्हणजे प्रेम,
 आदरयुक्त जिव्हाळा जपण्यासाठी

बाप म्हणजे वाटाड्या,
 कधी वाटा न चुकण्यासाठी

बाप म्हणजे धाक् ,
 शिस्त आणि शासन वळण्यासाठी!
 
बाप म्हणजे प्रेरणा,
 अभेद्य पुरुषार्थ जागवण्यासाठी!!

बाप म्हणजे बंधन,
 वाहवत जाणाऱ्या यौवनासाठी!!

बाप म्हणजे भिंत,
 मायेने अासरा देण्यासाठी!!

 बाप म्हणजे आदर्श,
   दिवास्वप्न साकारण्यासाठी!

बाप असतो, नेहमी रहातो!
 आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत!
 आपल्याला तेवत ठेवण्यासाठी..!
 
- चेतन कोठावदे

Friday, July 10, 2020

क्रोधज्वाळा😡😷

कटू भावनांचे रक्तरंजित सडे
गेले ओलांडून संयमाचे धडे!
मग्रूरतेत करी तो घाव आंधळा
कारण त्याचा क्रोध पांगळा!

उसवित जातो जहाल शब्द
गुंफण सुंदर नात्यांची,
बीभत्स तांडव करून येतो
उधळण अविवेकी क्षणांची!

अनावर जाहल्या क्रोधज्वाळा 
भाव भस्म करून जातो,
जाता जाता ठेवुनी येतो
कठोरतेच्या दाहक खुणा!!

सरतेशेवटी उरतो फक्त
पश्चात्तापाचा घडा!!
गीरवित बसतो उरले जीवन
निराशेचा पाढा!!

संयमाने जीवन फुलते
क्रोध स्वयंभू करू नये!
रुक्षतेचा शाप भारी
क्रोधाग्नीत जळू नये!

- चेतन कोठावदे








Thursday, July 2, 2020

विठ्ठलच झाला वारकरी!

नको मज पैका तुझा
भले, नको करू वारी
भाव वसो तुझा निर्मळ
हे एकची माझे मागणे !

सुख दुःख तुझे जाणाया
उभा ठाकलो मी येथेच
उगा नको होवू लाचार
ठेवत मनी वेदनेची सल!

व्यर्थ मिरवीत हरी
हिंडतात जगी काही,
जाण जात दंभिकाची
सोडी संग सत्वरी !

माझ्या तुक्याने लिहिले
अभंग रसाळ तात्विक,
करिता चिंतन तयांचे
होईल जीवन सात्त्विक !

बुक्का लावून ललाटी
नको पोसू मनी पाप,
हरण्या तुझे सारे ताप
ठेविलें मी कटेवरी हात !

नको मज पैका तुझा
भले, नको करू वारी
नित्य लाभू दे सहवास मज
तुझ्या निश्चल मानसि
हे एकची माझे मागणे !!

नको मज पैका तुझा...
भले, नको करू वारी...
अविचल निस्सीम भक्तीसाठी
होईल मी ही वारकरी..!!
होईल मी ही वारकरी..!!

- चेतन कोठवदे

Friday, June 5, 2020

वरुण आगमन..!

काल रातीच्या स्वप्नात 
झाले वरूणाचे आगमन
भिजवूनी गेला सृष्टी सारी
ऐन निद्रेच्या कुशीत..

जागी झाली पर्णवेली
पायवाटा जाग्या झाल्या
जागी झाली ओहोळवाट
वृक्षलता जाग्या झाल्या..

बळीराजा झाला मोदित
हर्ष मावेना गगनात..
दिवा कृतज्ञतेचा तेवून
समिप दात्याच्या जोडी हात..

घट्ट बिलगली बीजाला
बांधावरली माती..
"बघ आला कैवारी आपुला
कसलेच आता भय नाही"

छतावर तुझे थिरकने..
भासे एकांतातील गाणे
जणू आरोहातील लय..
अन् तिरकीट तालमय

तुझ्या आगमनात 
धो धो जलधारा..
चातका मनी दाटे
निश्र्वास वारा.‌.

वारा गाई तुझे गाणे..
विद्दुलेसव तुझे येणे..

करटुली शिराळी
तुझ्या प्रेमात पिवळी,
स्वागतास कदंब कर्दळी 
नटली सुंदर रानहळदी

आगमनाने तुझ्या 
सृष्टी सारी जागली
स्वप्नभेट आशादायी
अवघी सत्यात उतरली

तुच विठ्ठल , तुच सखा
तुच जीवांचा प्राणदाता
तुच अमृत , तुच औषधी
तुजविन जीवन असंभव..!

-चेतन कोठावदे

Wednesday, May 6, 2020

पुन्हा नव्याने..!!

पुन्हा शतसूर्य उजळतील
पुन्हा शतचन्द्र जागतील,
निर्माण सृष्टी करण्यास
पुन्हा ब्रह्म अवतरतील।

अंधारल्या राती सरतील
पुन्हा मशाली पेटतील,
असह्य काटेरी वेदनांतून
संयमीत जीवने फुलतील।

काळ भीतीचा शरमेल
भ्याड विकृति हारतील,
पुन्हा चैतन्य लहरितुनी
लाट निर्धाराची उसळेल।

मळभ निवृत्तिची झटकोनी
पुन्हा पुरूषार्थ स्फुरतील,
कर्तव्य-प्रवृत्तिंचे कूंजन
पुन्हा कानी पडतील।

नवी स्वप्ने पेरून रजनी
उषा उदयाची  प्रसवेल,
हर्षाला  फुटेल  पालवी
सारा  आसमंत  बहरेल।

- चेतन कोठवदे

Monday, April 20, 2020

गदिमा-१00

परीस म्हणावा प्रतिभेचा,
की उत्कट बिंदु भक्तिचा?

जाणावा निस्सीम देशभक्त,
की केवळ कवी कलासक्त?

शब्दसाठा अमाप म्हणावा;
की स्वतः शब्दसंग्रह अनोखा,?

काय द्यावी उपमा ह्यांसि
प्रश्न मानसि पडलासी??

कलियुगे अवतरला वाल्मीकि जणू ;
एकमुखी सारे गीतरामायण म्हणू!

वंद्य वंद्य गदिमा
वंदन तव प्रतिभेसी।
अमर जाहले शब्द तुझे
वंदन तव कर्यासी!!


-चेतन कोठावदे

Wednesday, April 15, 2020

छंद रामाचा !!

ज्याला छंद नाही रामाचा
तो देह काय रे कामाचा?
ज्याला गंध नाही भक्तिचा
तो जन्म नाही मुक्तीचा..!

पितृआज्ञा शिरोधारी
राम गेला वनवासी,
कंटकांच्या मार्गातुनि
संस्कृतीचा थाट भारी,
पितृभक्त ऎसा होणे
होते योग्याचे ध्यानी!

भरताने त्यागावी राजगादी
लक्ष्मणाने चरणी सेवा द्यावी,
असे बन्धुत्वाचे शील होते
जीवन रामाचे आदर्श होते..

मैत्री राम सुग्रीवाची
रावणास पडली भारी,
हनुमंतासम सेवक जेथे
जानकीस्तव जो लंका जाळे!

नीतिमत्तेच्या शिळेवरी
राज्य उभे श्रीरामाचे ,
वचनबद्ध ते जीवन होते
कौसल्या पुत्र वीराचे !

करावे रामाचे कंदन
व्हावे नाश रघुनंदन,
कपट ऐसे मनी जयांचे
मनोरथ जाहले भस्म तयांचे..

संहारूनी दुर्जनांसी
रक्षिण्या सदा सज्जनांसि,
वल्लभ घेई अवतार रामाचा
धर्म क्षत्रिय करी वध रावणाचा!

मनातूनि राम जागरण
रामावीन जीवन ते मरण,
खरी शिदोरी भक्तीची
नांदी ही रामराज्याची।

सत् रक्षणाय
खल निग्रहणाय।
रामाय तस्मै नमः
रघुनाथाय नमो नमः।।

-चेतन कोठावदे

Wednesday, March 25, 2020

ग्रहण महामारीचे।

नववर्षास लागले
ग्रहण महामारीचे! 😢
थैमान घातले मृत्युने,
घेऊन रूप कोरोनाचे।

रिक्त जाहली देवालये,
मुफ्त जेथे मागणे
भक्तांविन पोरके
आस्तित्व पांडुरंगाचे।

रिक्त जाहले पथ सारे,
स्वैर जेथे संचार होते

रिक्त जाहले भेद सारे,
धर्मांध जेथे वाद-भोवरे

रिक्त जाहल्या जाती-पाती,
माणुसकीचे ज्यास कुंपन खोटे

रिक्ततेच्या पात्रामध्ये,
विरक्त आता जगणे झाले

जगणे-मरणे आता तिर्‍हाईक
येथे नुसतेच श्वास उरले।

संयमातच आता जय,
ढळेल त्याचा पराजय

एकान्ते सुखमास्यात।
जगूया थोड़े निर्वातात

चला सारे लढू धीराने,
गुढी उभारु विवेकाने!!

-चेतन कोठावदे

Saturday, February 29, 2020

होवो विठ्ठल।

होवो काया विठ्ठल
होवो मन विठ्ठल !

रूप पाहता गोजिरे,
व्हावे भक्तीचे सोयरे

घेउनि हाती टाळ मृदुंग
गाऊ पांडुरंग पांडुरंग!!

-चेतन कोठावदे

Friday, February 28, 2020

कुसुम मराठीचे

सुमनांजली शब्दांची
वाहतो तुज शारदे!
दे प्रतिभेस आमुच्या
नवनिर्मितीचे वारसे!

गंध मराठीचा पसरवोनी गेले
 ह्या जगी एक कुसुम!
स्मरुनी त्या कवी अग्रजास आज;
 गातो मराठीचे गुणगान...
सार्थ होवो मराठी भाषा दिन।

-चेतन कोठावदे

Monday, February 24, 2020

शतदा वंदन

देह घेऊन आलो होतो,
तुम्ही विवेकी स्पर्श दिला
भाव मनीचे स्पर्शउनि,
तुम्ही मानव्याला जन्म दिला

कोण अर्जुन कैसा कृष्ण?
विसर आम्हा पडला होता,
अहंतेच्या वृथा गप्पा-
छंद होऊनि बसला होता

पाषाण जाहल्या हृदयामधुनि
कुसुम गीतेचे तुम्ही फुलविले,
चक्रधारी जय योगेश्वराला
मनामनातुनी उभे केले !

व्यास वाल्मीकि विचारांचा
यज्ञ तुम्ही उभारला,
ऋषीस्मरण करवुनी दादा;
जगी वेदमंत्र दिधला

अष्टकांचे घेऊनी गान मुखी
भावगंगेतूनी कृष्ण न्हाला,
उत्क्रांतिचा मार्ग 'स्वाध्याय'
नव्याने आम्ही गिरविला

कधी वृक्षातूनी देव जागविला
कधी मूर्तिपूजेतूनी भेटविला,
तुमच्या रुपात दादा-
देवदूतच आम्हासी गवसला।

सोहळा कृतज्ञतेचा करोनि
गौरव मनुष्याचा साकारला
शतशः वंदन तुम्हास दादा!
शतशः वंदन तुम्हास दादा!!
तुम्ही मनुष्य (पुन्हा) उभा केला.

- चेतन कोठावदे