हरवले शिंपले समाधानाचे,
संपत्तीच्या किनाऱ्यावर
एक अब्जाधीश भिकारी आहे!
मैलांचा प्रवास करून येते
नदी भेटावयास घेऊन गूज,
कसा सामावतोस तिला तू
सहज,भोवरे हटवून दूर
कोलाहल विसरून वेदनेचे
मनुष्य सुख ओरबडत आहे
नाव सोडून अस्तित्वाची
वृथा अहंकारात बुडत आहे
हरी नाही जीवनात
शुष्क हृदयी काहूर आहे,
तुझ्या पाहून असंख्य वृत्ती
जीवन प्रवाहित होवू पाहत आहे
किनाऱ्यावर आलो तुझ्या
मनात हजार लाटा घेऊनी,
शांत कसे व्हावे शिकलो
तुझ्या धरांच्या कुशीतूनी!
सम साधावी जगण्यातली
समतोल तुझा पाहून
"गम" जावा आम्ही विसरून
तुझा "गss मss" ऐकून...
तुझ्या किनाऱ्यावर
अशी काय जादू आहे?
लाखो व्यथा रित्या येथे..
संकल्प नवे बांधून जात आहे!
- चेतन कोठावदे, नाशिक
(From तारकर्ली बीच)